अंबरनाथ : अंबरनाथमधील नियमबाह्य तसेच भंगार झालेल्या रिक्षांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज अंबरनाथमध्ये रिक्षाचालक आणि मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि चालकांनी पश्चिम भागात रिक्षा वाहतूक बंद करून आंदोलन केले.
रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील हे आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडीबाबत वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले असताना अध्यक्ष पाटील यांच्याशी वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यामुळे संतप्त रिक्षाचालकांनी रेल्वे स्थानक परिसरात काही काळ आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच पोलिस तसेच वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली. तसेच नियमबाह्य आणि स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात अनेक ठिकाणी अधिकृत रिक्षा स्टँड असतानाही काही भागात बेकायदा रिक्षा स्टँड निर्माण झाले आहेत. त्याचा त्रास अधिकृत रिक्षा चालकाना होतो, बेकायदा रिक्षा स्टँडबाबत वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला. नियमबाह्य रिक्षा , स्क्रॅप वाहने आणि बेकायदा अनधिकृत रिक्षा स्टँडवर त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.